Blog : कोलकाताच ठरला सर्वोत्तम संघ; तिसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी

28 May 2024 11:05:32

Kolkata Knight Riders Won IPL trophy for the 3rd time
 (Image Source : Twitter)
 
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. रविवारी झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने पॅट कमिन्सच्या सन राईजर्स हैद्राबादला अवघ्या १० षटकात नमवून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.
 
अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ हे तुल्यबळ होते. कारण दोघांनीही साखळी सामन्यात चांगली कामगिरी करून पॉईंट टेबलवर पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होणार यात कोणालाही शंका नव्हती. हा सामना रंगतदार होईल आणि क्रिकेट रसिकांना आयपीएलचा थरार अनुभवता येईल अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना होती.  मात्र क्रिकेट प्रेमिंच्या अपेक्षेवर पाणी पडले आणि सामना रंगतदार होण्याऐवजी एकतर्फी झाला.
 
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तेंव्हा हैद्राबाद संघ धावांचा डोंगर उभारेल किमान दोनशेच्यावर धावा काढेल अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींना होती कारण या संघाने याआधी असा पराक्रम अनेकदा केला आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम याच संघाने याच वर्षी केला आहे. त्यांची सलामीची जोडी ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा ही या आयपीएल मधील सर्वात खतरनाक जोडी होती. या जोडीने संघाला नेहमीच तडाखेबंद सुरुवात करून दिली. त्यामुळे अंतिम सामन्यातही ते अशीच कामगिरी करतील अशी आशा होती. मात्र कोलकाताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा याला बाद केले, तर त्याच्या पुढच्या षटकात वैभव आरोराने हैद्राबादचा हुकुमी एक्का ट्रेवीस हेड याला बाद करत हैद्राबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
 
हेही वाचा : IPL2024 : करबो,लढबो, जीतबो म्हणत कोलकाता नाईट रायडर्स संघ अजिंक्य
 
पहिल्या दोन षटकात सलामीची जोडी गारद झाली या धक्क्यातून हैदराबाद सावरलीच नाही. त्यांचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. ज्या संघाकडून दोनशेपेक्षा अधिक धावांची अपेक्षा होती तो संघ कसाबसा शतक पार करू शकला. अवघ्या ११३ धावात हौदराबादचा संघ तंबूत परतला आणि तिथेच सामन्याचा निकाल काय लागणार हे स्पष्ट झाले. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. ११४ धावांचे माफक लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये म्हणजे पहिल्या सहा षटकात ७२ धावा कुटून कोलकाताने आपला विजय निश्चित केला. त्यांच्या वेंकटेश अय्यरने तडाखेबंद नाबाद अर्धशतक झळकावले, तर गुरुबाजने ३९ धावांची खेळी केली. कोलकाताने अवघ्या अवघ्या दहा षटकात ११४ धावा काढत आठ विकेट राखून विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आणि आपल्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली.
 
कोलकाताचा हा विजय सांघिक विजय आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्रारक्षण या तिन्ही आघाडीवर या संघाने अप्रतिम कामगिरी केली. केवळ अंतिम सामन्यातच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत कोलकाताने अप्रतिम कामगिरी केली म्हणूनच हा संघ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अव्वल क्रमांकावर राहिला. श्रेयस अय्यरनेही संघाचे नेतृत्व कुशलतेने केले. या विजयाचे जितके श्रेय या संघातील खेळाडूंना जाते तितके किंबहुना त्याहून अधिक श्रेय या संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला जाते कारण या विजयामागचा खरा चेहरा जर कोण असेल तर तो गौतम गंभीर आहे. गंभिरला आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक का म्हटले जाते हे त्याने या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिले. वास्तविक या वेळच्या कोलकाता संघात दादा म्हणावा असा एकही खेळाडू नव्हता. श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण वगळता एकही आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू या संघात नव्हता. अगदी नवोदित आणि आंतरराष्ट्रीय करियर संपलेल्या खेळाडूंचा हा संघ होता, पण म्हणतात ना परिसच्या स्पर्शाने सोने होते तसे या खेळाडूंचे झाले. या संघातही तसा परिस होता तो म्हणजे प्रशिक्षक गौतम गंभीर.
 
कोलकाताला पुन्हा आयपीएल विजेता बनवायचे असेल तर गौतम गंभीर शिवाय पर्याय नाही हे ओळखून कोलकाताच्या संघ मालकाने म्हणजे शाहरुख खानने त्याची संघाच्या प्रशिक्षक पदी निवड केली. गौतम गंभीरने या आधी कर्णधार म्हणून कोलकोताला दोनदा विजितेपद मिळवून दिले आहे आता तो प्रशिक्षक म्हणून संघाला विजेतेपद मिळवून देईल असा ठाम विश्वास शाहरुखला होत. गौतम गंभीरनेही संघाला विजेतेपद मिळवून देत हा विश्वास सार्थ ठरवला. गौतम गंभीरने प्रशिक्षकपद स्वीकारताच संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी समाजवून सांगितली आणि त्यांच्याकडून अपेक्षित ती कामगिरी करून घेतली. सुनील नारायण या लेग स्पिनरला त्याने सलामीला पाठवले आणि त्याला तडाखेबंद फलंदाजीची मुभा दिली. सुनील नारायणने प्रत्येक सामन्यात तडाखेबंद फलंदाजी करून त्याचा विश्वास सार्थ ठरवला. फिल साल्ट आणि गुरुबाज यांना त्याच्या सोबत सलामीला पाठवून त्यांच्याकडूनही त्याने चांगली कामगिरी करून घेतली. वेंकटेश अय्यर या आणखी एका तडाखेबंद फलंदाजाला त्याने तिसऱ्या क्रमांकावर पाठवून त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेतली.
 
कर्णधार श्रेयस अय्यर यानेही अपक्षे प्रमाणे कामगिरी केली तर रसेल आणि रिंकू सिंगला फिनिशरची भूमिका दिली ती त्यांनी चोख बजावली. गोलंदाजीत स्टार्क, रसेल यांनी वेगवान मारा केला तर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण ने फिरकीची भार सांभाळला. सर्व खेळाडूंनी त्यांना दिलेली भूमिका चोख बजावली त्यामुळे कोलकाता संघ हे विजेतेपद मिळवू शकले. अर्थात गौतम गंभीरने या खेळाडूंमधील गुणवता हेरली आणि त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेतली आणि कोलकाता संघाला विजयी केले. गंभीरच्या परिस स्पर्शामुळे या खेळाडूंचे सोने झाले आणि हा संघ विजयी झाला. कोलकाताने आपणच आयपीएल मधील सर्वोत्तम संघ आहोत हे दाखवून देत दिमाखात विजय मिळवत आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा स्वतःचे नाव कोरले. विजयी कोलकता नाईट रायडर्स संघाचे मनापासून अभिनंदन!

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0