IPL2024 : करबो,लढबो, जीतबो म्हणत कोलकाता नाईट रायडर्स संघ अजिंक्य

    27-May-2024
Total Views |

IPL 2024 Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad
(Image Source : tw/@KKRiders)

एबी न्यूज नेटवर्क :
कर बो... लढ बो... जीत बो... म्हणत कोलकाता नाईट रायडर्सन आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे जेतेपद आपल्या नावी केले. वर्ष २०१२, २०१४ आणि त्यानंतर यंदा २०२४ असे करीत कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्यां गोलंदाजांच्या चोख माऱ्याच्या बळावर सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला.
 
 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार पॅट कमिन्सने घेतला. पण हा निर्णय त्याला फलदायी ठरला नाही आणि हैदराबादचा डाव १८.३ षटकांत ११३ धावांवर आटोपला. कमिन्सने १९ चेंडूत २ चौकार व १ षटकाराने सर्वाधिक २४ धावा काढल्या. तसेच त्याने तळाचा फलंदाज जयदेव उनादकट (४) सोबत नवव्या गड्यासाठी २३ धावांची भागीदारी रचली. तत्पूर्वी, मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माच्या (२) यष्ट्या वाकवल्या, वैभव अरोडाने ट्रेव्हिस हेडला शून्यावर माघारी धाडले. स्टार्कने त्यानंतर राहुल त्रिपाठीला (९) क्षेत्ररक्षक रमनदीप सिंगकडे झेल देण्यास भाग पाडले. ४.२ षटकांत ३ बाद २१ नंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी काही अंशी प्रतिकार केला, नितीश कुमार रेड्डी १३ धावा काढून परतला. त्यानंतर ॲडन मार्कराम (२०) बाद झाल्याने हैदराबादने निम्मा संघ ६२ धावांत गमावला. शाहबाज अहमद (८) आणि इम्पॅक्ट प्लेअर अब्दुल समद (४) धावांवर परतल्यामुळे हैदराबादचा डाव अडचणीत आला. एक बाजू लावून धरणाऱ्या हेनरिच क्लासेनच्या (१६) बॅटला चेंडू लागून यष्ट्यांवर आदळला. कमिन्सने उनादकटसोबत संघाला शतकापार पोहोचवले. कोलकाताकडून अधि रस्सेल (३ बळी १९ धावा) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. स्टार्क व हर्षित राणाने प्रत्येकी २ बळी घेतले,तर वैभव अरोडा, सुनील नरिन व वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.
 
 

आव्हानाचा पाठलाग करताना नरिन (६) बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाझ आणि तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या व्यंकटेश अव्यरने त्यानंतर धावफलक हलता ठेवला, अंतिम फेरीत दबाव येऊ नये, म्हणून दोघांनी जोखमीचे फटके मारणे टाळले, डावखुऱ्या व्यंकटेशने २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. लक्ष्याच्या समीप आल्यावर गुरबाझ (३९ धावा, ५ चौकार, २ पटकार) बाद झाला, गुरबाज व व्यंकटेश यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी रचली. व्यंकटेशने अखेरची घाव घेतल्यानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी मैदानात धाव घेतली, व्यंकटेशने २६ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांनी नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी सजवली.

असे मिळाले पुरस्कार
■ विजेता : कोलकाता २० कोटी
■ उपविजेता : हैदराबाद १३ कोटी
■ ऑरेंज कॅप : विराट कोहली(७४१ धावा) १५ लाख रुपये
■ पर्पल कॅप : हर्षल पटेल (२४ बळी) १५ लाख रुपये