अनेक संस्थांनी संघटितपणे केलेला हा प्रयत्न अलिकडच्या वर्षांतील सर्वात लक्षणीय बचावकार्यांपैकी एक - नितीन गडकरी

29 Nov 2023 13:16:44
  • सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल नितीन गडकरींकडून कृतज्ञता व्यक्त
silkyara-tunnel-rescue-success-nitin-gadkari - Abhijeet Bharat
 
नवी दिल्ली : सिल्कयारा बोगद्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या 41 मजुरांची यशस्वीपणे सुटका करण्यात आल्यामुळे मला पूर्ण दिलासा मिळाला आहे आणि आनंद झाला आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सुखरूप बाहेर काढण्यात आले. तब्बल १७ दिवसांनी हे मजूर बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर देशभरात आनंद साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी देखील ४१ मजुरांच्या बचावकार्याच्या यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
 
 
 
एका पोस्टमध्ये गडकरी म्हणाले की, अनेक संस्थांनी संघटितपणे केलेला हा प्रयत्न अलिकडच्या काही वर्षांमधील सर्वात लक्षणीय बचाव कार्यांपैकी एक आहे. अनेक आव्हानांना तोंड देत विविध विभाग आणि संस्थांनी एकमेकांना पूरक काम केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे, तसेच सर्वांच्या प्रार्थनांमुळे हे ऑपरेशन सफल ठरले, असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा : Uttarakhand Tunnel Collapse : अखेर ४१ मजुरांच्या जिवात जीव आला; १७ दिवसानंतर जिंकली जीवनाची लढाई
 
गडकरी म्हणाले की, बचाव पथकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले. या बचाव कार्यात सहभागी झालेली प्रत्येक संस्था आणि व्यक्ती प्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय बचाव तज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि उत्तराखंड सरकारच्या जलद आणि प्रभावी प्रतिसादाची प्रशंसा केली.
 
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, या संपूर्ण ऑपरेशनवर सतत देखरेख ठेवणारे आणि गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन आणि सहाय्य देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण आभार मानत आहोत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि त्यांचे सहकारी जनरल व्ही के सिंह (निवृत्त) यांनी संपूर्ण ऑपरेशनच्या काळात घटना स्थळी जवळजवळ मुक्काम ठोकला होता. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी आणि अभियंत्यांचेही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी आभार मानले आहेत.
 
 
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामाधीन सिलक्यारा बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी कोसळला होता. ऐन दिवाळीच्या दिवशी या बोगद्यात कार्यरत असलेले ४१ मजूर तेथेच अडकून पडले. बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नसल्याचे त्या काळोखात सर्व मजुरांना तिथेच थांबावे लागले. यानंतर केंद्र सरकारने तातडीने सूत्र हालवत मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य हाती घेतले. विविध प्रकारे मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उभ्या, आडव्या आणि बाजूने बोगद्यात ड्रिलिंग करण्यात आले. मात्र, शेवटी बोगदा खोदून ढिगारा काढण्यासाठी रॅट होल मायनिंग तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. यावेळी त्यांनी हाताने ढिगारा काढून तब्बल १७ दिवसांनंतर सर्व मजुरांची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व मजुरांना उत्तराखंडमधील चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांची तपासणी करत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0