Uttarakhand Tunnel Collapse : अखेर ४१ मजुरांच्या जिवात जीव आला; १७ दिवसानंतर जिंकली जीवनाची लढाई

    29-Nov-2023
Total Views |
 
uttarakhand-tunnel-collapse-41-workers-rescued - Abhijeet Bharat
 
देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बोगद्यात अडकलेले ४१ मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अखेर जीवात जिवात जीव आला आहे. तब्बल ४०० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सुखरूप बाहेर काढण्यात आले. १७ दिवसांनी मजूर बोगद्याच्या बाहेर येताच त्यांनी आपल्या कुटुंबीयांची भेट घेत सुटकेचा निश्वास घेतला. महत्वाची बाब म्हणजे सिलक्यारा येथील हे बोगद्यातील बचावकार्य देशातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले आहे. देशभरात सध्या ४१ मजुरांच्या सुखरूप परतीबद्दल आनंद साजरा केला जात आहे. इतकेच नाही तर भारतासह जगभरात या कार्यात गुंतलेल्या सर्व जवानांची प्रशंसा होत आहे.
 
 
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामाधीन सिलक्यारा बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी कोसळला होता. ऐन दिवाळीच्या दिवशी या बोगद्यात कार्यरत असलेले ४१ मजूर तेथेच अडकून पडले. बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नसल्याचे त्या काळोखात सर्व मजुरांना तिथेच थांबावे लागले. यानंतर केंद्र सरकारने तातडीने सूत्र हालवत मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य हाती घेतले. विविध प्रकारे मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उभ्या, आडव्या आणि बाजूने बोगद्यात ड्रिलिंग करण्यात आले. मात्र, शेवटी बोगदा खोदून ढिगारा काढण्यासाठी रॅट होल मायनिंग तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. यावेळी त्यांनी हाताने ढिगारा काढून तब्बल १७ दिवसांनंतर सर्व मजुरांची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व मजुरांना उत्तराखंडमधील चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांची तपासणी करत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आला.
 
 
उत्तरकाशी जिल्ह्यातील या बोगदा दुर्घटनेत अडकलेले बहुतांश कामगार हे झारखंडचे रहिवासी होते. ४१ पैकी १५ मजूर झारखंडमधील, तर ७ उत्तर प्रदेशातील, ५ बिहार, ५ ओडिशाचे, ३ पश्चिम बंगाल, ३ उत्तराखंड, २ आसाम आणि एक हिमाचल प्रदेशातील होते. दरम्यान, यापूर्वी १३ नोव्हेंबर १९८९ रोजी पश्चिम बंगालमधील महाबीर कोलियरी राणीगंज कोळसा खाणीतून ६५ कामगारांना दोन दिवस चाललेल्या ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. ही मोहीम आपल्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्यासाठी देशभरातील आणि जगभरातील तज्ज्ञांनी रात्रंदिवस काम केले होते.
 
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचावकार्याच्या यशानंतर माहिती देताना सांगितले की, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद ही माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. सिल्क्यरा (उत्तराकाशी) येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात सर्व कामगार बांधवांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली चालवण्यात आलेल्या या आव्हानात्मक बचाव मोहिमेत पूर्ण ताकदीनिशी सहभागी झालेल्या केंद्रीय संस्था, लष्कर, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि राज्य प्रशासन यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार. एक पालक या नात्याने आम्हा सर्वांना पंतप्रधानांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली शक्य ती मदत, हा या मोहिमेच्या यशाचा मुख्य आधार होता. १७ दिवसांनी आपल्या कुटुंबियांना भेटणे हा कामगार बांधवांसाठी खूप भावनिक क्षण आहे.
 
पुढे ते म्हणाले, सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी गेल्या १७ दिवसांपासून अथक परिश्रम घेणाऱ्या बचाव पथकातील सदस्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.
 
 
अशक्य वाटणारे हे मिशन केंद्रीय यंत्रणा, लष्कर आणि राज्य प्रशासनाच्या टीमच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आणि तुम्हा सर्वांच्या समर्पणामुळे यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप आदर, अशा शब्दात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सर्वांचे आभार मानले.