लघवी प्रकरणी एअर इंडियावर DGCA ची मोठी कारवाई; बसला ३० लाखांचा दंड

    20-Jan-2023
Total Views |

Air India
(Image Source : Internet/ Representative image)
 
नई दिल्ली :
गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India) विमानातून प्रवास करणाऱ्या एका पुरुष प्रवाशाने वृद्ध महिला प्रवाशावर चक्क लघवी केल्याची धक्कादायक घृणास्पद घटना समोर आली होती. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीने असे घृणास्पद कृत्य का केले, याचे कारण ऐकून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय DGCA ने एअर इंडियाच्या वैमानिकाच्या तीन महिन्यांसाठी परवानाही निलंबित केला आहे. इतकेच नाही तर एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना देखील ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
दरम्यान, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये वृद्ध महिलेशी घृणास्पद आणि अश्लील कृत्य करणाऱ्या पुरुष प्रवाशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पुरुष प्रवाशाचे नाव शंकर मिश्रा असे आहे. अनेक दिवसांपासून आरोपी फरार होता. मात्र, पोलिसांनी ७ जानेवारी रोजी बंगळुरू येथून आरोपीला अटक केली होती. शंकर मिश्रा याने दारूच्या नशेत वृद्ध महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले होते. या प्रकरणानंतर एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्रावर चार महिन्यांसाठी फ्लाईमध्ये प्रवास करण्यावर बंदी देखील घातली आहे.
 
काय आहे नेमके प्रकरण?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून महिला बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती. यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर उघडपणे लघवी केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही घटना इतर कुठे नाही तर एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये घडली. यानंतर महिलेने तातडीने विमानातील क्रू मेंबर्सकडे धाव घेत या संतापजनक कृत्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर महिलेला काही कपडे देऊन क्रुकेबिनमध्ये बसायला सांगण्यात आले होते. मात्र पुरुष प्रवाशाविरुद्ध कुठलीही कारवाई न होता विमान दिल्लीला उतरल्यानंतर तो स्वतंत्रपणे निघून गेला.
 
 
शेवटी वृद्ध महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून तक्रार केली. त्यानंतर एअर इंडियाने या घटनेची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली. महिलेने आपल्या पत्रात लिहिले की, 'अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक परिस्थिती सांभाळण्यासाठी क्रू सक्रिय नव्हता आणि मला प्रतिसाद मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली. त्या परिस्थिती मला स्वतःची वकिली मला करावी लागली. या घटनेदरम्यान एअर इंडियाने माझी सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला नाही, याचा मला खेद आहे.'
 
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क-जेएफके विमानतळावरून निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट AI-१०२ मध्ये घडल्याचे सांगण्यात आले होते. 'दुपारचे जेवण झाल्यावर जेव्हा विमानातील लाईट बंद झाले, तेव्हा हा पुरुष प्रवासी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत माझ्या सीटकडे आला. त्यानंतर त्याने आपल्या पँटची चैन उघडली आणि माझ्यासमोर त्याचा प्रायव्हेट पार्ट उघड करून उभा राहिला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या व्यक्तीने लघवी केली आणि तो तिथेच उभा राहिला. एका अन्य प्रवाशाने त्याला तेथून निघून जाण्यास सांगितल्यानंतर तो तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर महिलेने तातडीने केबिन क्रू मेंबर्सला या घटनेची माहिती दिली. 'माझे कपडे, शूज आणि बॅग लघवीमुळे पूर्णपणे खराब झाले होते. यानंतर क्रूमेंबर माझ्यासोबत माझ्या सीटजवळ आले, लघवीचा वास येता असल्याचे सुनिश्चित केले आणि माझ्या बॅगवर आणि शूजवर जंतूनाशक फवारले,' असेही महिलेने आपल्या पत्रात सांगितले होते.
 
महिलेने एअरलाईन्सच्या टॉयलेटमध्ये स्वतःला स्वच्छ केले आणि क्रूने दिलेले कपडे घातले. यानंतर महिला पूनम आपल्या सीटवर जाण्यास सहमत नव्हती. बऱ्याच वेळपर्यंत टॉयलेटजवळ उभे राहिल्यानंतर महिला प्रवाशाला क्रू केबिनमधील छोटी सीट देण्यात आली. तिथे ती एक तास बसली आणि नंतर महिलेला तिच्या सीटवर परत जाण्यास सांगण्यात आले. पहिल्या श्रेणीतील बऱ्याच सीट रिकाम्या असतानाही महिलेला क्रू सीटवर बसण्यात आले होते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.