असे काय झाले की एअर इंडियातील व्यक्तीने चक्क महिला प्रवाशावर केली लघवी

    04-Jan-2023
Total Views |

Air India (Image Source : Internet/ Representative image)
मुंबई :
एअर इंडियाच्या (Air India) विमानात आज एक घृणास्पद असे कृत्य घडले आहे. एअर इंडियातून प्रवास करणाऱ्या एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर चक्क लघवी केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने असे घृणास्पद कृत्य का केले, याचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
 
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून महिला बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती. यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर उघडपणे लघवी केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही घटना इतर कुठे नाही तर एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये घडली. यानंतर महिलेने तातडीने विमानातील क्रू मेंबर्सकडे धाव घेत या संतापजनक कृत्याबद्दल तक्रार केली.
हे आहे संपूर्ण प्रकरण:
एयर इंडिया विमानातील बिझनेस क्लासमधून दारूच्या नशेत धुत्त असलेला एक पुरुष प्रवासी प्रवास करत होता. अशा स्थितीत त्याने सोबत प्रवास करत असलेल्या महिला प्रवाशावर उघडपणे लघवी केली. यानंतर महिलेने विमानातील केबिन क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. यानंतर महिलेला काही कपडे देऊन क्रुकेबिनमध्ये बसायला सांगण्यात आले. मात्र पुरुष प्रवाशाविरुद्ध कुठलीही कारवाई न होता विमान दिल्लीला उतरल्यानंतर तो स्वतंत्रपणे निघून गेला.
शेवटी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून तक्रार केली. त्यानंतर एअर इंडियाने या घटनेची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली. महिलेने आपल्या पत्रात लिहिले की, 'अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक परिस्थिती सांभाळण्यासाठी क्रू सक्रिय नव्हता आणि मला प्रतिसाद मिळण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली. त्या परिस्थिती मला स्वतःची वकिली मला करावी लागली. या घटनेदरम्यान एअर इंडियाने माझी सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला नाही, याचा मला खेद आहे.'
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क-जेएफके विमानतळावरून निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट AI-१०२ मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. 'दुपारचे जेवण झाल्यावर जेव्हा विमानातील लाईट बंद झाले, तेव्हा हा पुरुष प्रवासी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत माझ्या सीटकडे आला. त्यानंतर त्याने आपल्या पँटची चैन उघडली आणि माझ्यासमोर त्याचा प्रायव्हेट पार्ट उघड करून उभा राहिला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या व्यक्तीने लघवी केली आणि तो तिथेच उभा राहिला. एका अन्य प्रवाशाने त्याला तेथून निघून जाण्यास सांगितल्यानंतर तो तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर महिलेने तातडीने केबिन क्रू मेंबर्सला या घटनेची माहिती दिली. 'माझे कपडे, शूज आणि बॅग लघवीमुळे पूर्णपणे खराब झाले होते. यानंतर क्रूमेंबर माझ्यासोबत माझ्या सीटजवळ आले, लघवीचा वास येता असल्याचे सुनिश्चित केले आणि माझ्या बॅगवर आणि शूजवर जंतूनाशक फवारले,' असेही महिलेने आपल्या पत्रात सांगितले.
महिलेने एअरलाईन्सच्या टॉयलेटमध्ये स्वतःला स्वच्छ केले आणि क्रूने दिलेले कपडे घातले. यानंतर महिला पूनम आपल्या सीटवर जाण्यास सहमत नव्हती. बऱ्याच वेळपर्यंत टॉयलेटजवळ उभे राहिल्यानंतर महिला प्रवाशाला क्रू केबिनमधील छोटी सीट देण्यात आली. तिथे ती एक तास बसली आणि नंतर महिलेला तिच्या सीटवर परत जाण्यास सांगण्यात आले. पहिल्या श्रेणीतील बऱ्याच सीट रिकाम्या असतानाही महिलेला क्रू सीटवर बसण्यात आले.
संपूर्ण प्रकरणावर एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, 'आम्ही एअर इंडियाच्या चालक दलातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी आणि परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यात विलंब करणाऱ्या कमतरतांचे निराकरण करण्यासाठी एक अंतर्गत समिती देखील स्थापन केली आहे. चौकशी आणि अहवाल प्रक्रियेदरम्यान आम्ही पीडित प्रवासी आणि तिच्या कुटुंबाच्या नियमित संपर्कात आहोत.' तसेच एअर इंडियाने या घटनेत एक अंतर्गत समिती स्थापन केली असून पुरुष प्रवाशाला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्याची शिफारस केली आहे. हे प्रकरण सरकारी समितीच्या अंतर्गत आहे असून निर्णयाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय आम्ही एअरलाईनकडून अहवाल मागवत आहोत आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करू, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांनी घटनेबाबत सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद पुरुष प्रवाशाने एका महिला सहप्रवाशावर लघवी केल्यानंतर एफआयआर नोंदवला जात आहे. महिला प्रवाशाने एअर इंडियाला ही बाब कळवली होती, त्यानंतर २८ डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच प्रवाशाला एअर इंडियासोबत ३० दिवसांसाठी किंवा अंतर्गत समितीचा निर्णय येईपर्यंत उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषी आढळल्यास, अनियंत्रित प्रवाशाविरुद्ध नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल, असे एअर इंडियाचे प्रवक्ते म्हणाले. महत्वाचे म्हणजे एनसीडब्ल्यूने या घटनेची दखल घेतली असून आयोगाने एअर इंडियाच्या अध्यक्षांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे आणि सविस्तर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, पुढील ७ दिवसांत अहवाल देण्यासही सांगितले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.