जीवनशैलीतील सुधारणेमुळेच मधुमेह नियंत्रण शक्‍य - डॉ जगन्नाथ दीक्षित

    21-Jun-2024
Total Views |
- मधुमेहावर यशस्‍वीरित्‍या नियंत्रण मिळविलेल्‍या रुग्णाचा सत्कार
 
Honoring a Patient
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
बिघडलेल्‍या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत असून देशातून या आजाराचे समूळ उच्चाटन करायचे असल्‍यास जीवनशैलीत सुधारणा करण्‍याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे ठाम मत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.
 
 
इन्फोसिस फाउंडेशनच्‍या सहकार्याने डॉ. जगन्‍नाथ दीक्षित यांच्‍या असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल ट्रस्ट (अडोर) तर्फे प्रतापनगर येथे मधुमेह मुक्‍ती समुपदेश केंद्र चालवले जाते. मधुमेह झालेल्‍या सुमारे 800 रुग्‍णांचे येथे समुपदेशन केले जात असून ज्‍यांनी यशस्‍वीरित्‍या मधुमेहावर नियंत्रण मिळवले आहे, अशा रुग्‍णांचा सत्‍कार बुधवारी आयोजित कार्यक्रमात सत्‍कार करण्‍यात आला. रवींद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उपस्‍थ‍ितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश रोडे होते तर ॲडोर ट्रस्ट नागपूर केंद्राचे संचालक हेमंत काळीकर व सदस्‍य डॉ. उदय गुप्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
दीक्षित जीवनशैली आत्‍मसात केल्‍यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो, हे सिद्ध झाले असून टाईम 2 मधुमेहापासून मुक्‍ती मिळवणाऱ्या रुग्‍णांची वाढती संख्‍या बघता मधुमेह क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती होऊ घा तल्‍याचे डॉ. दीक्षित म्हणाले. आतापर्यंत ज्‍यांना दीक्षित जीवनशैलीचा लाभ झालेला आहे त्‍यांनी या उपचार पद्धतीचा प्रचार करावा, त्‍यांनी ब्रँड ॲम्‍बेसेडर व्‍हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्‍यांनी उपस्थितांच्या शंकांचे यावेळी निरसन केले. मधुमेही रुग्‍णांसाठी खास तयार करण्‍यात आलेल्‍या भोजनाच्‍या थाळीचा यावेळी सर्वांनी आस्‍वाद घेतला.
 
डॉ. अविनाश रोडे यांनी अध्यक्षीय भाषणातून या संकल्‍पनेचे जनक कै. श्रीकांत जिचकार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मनाचा निश्चय करून नियमीत व्‍यायाम केला व आहारावर नियंत्रण ठेवले तर डॉ. दीक्षित यांनी सुरू केलेले हे मधुमेह मुक्‍तीचे अभियान यशस्‍वी होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करताना डॉ. दीक्ष‍ित यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मनोकामना व्यक्त केली.
हेमंत काळीकर यांनी प्रास्ताविकातून अडोर नागपूर केंद्राच्‍या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर आभार अनंत वाघमारे यांनी आभार मानले.