- नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
नागपूर :
रविवार म्हंटलं की सुट्टीचा दिवस. पण आजची सुट्टीची सकाळ नागपूरकरांसाठी उत्साहाची ठरली. महाल येथे आज सकाळी नागपूरकरांनी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून आपल्या दिवसाची सुरुवात केली.
महाराष्ट्रीयन आणि हिंदू संस्कृतीला साजेल असे नवीन उपक्रम
नागपुरातील बातचीत डॉट कॉम या संस्थेने महालमधील कोतवाली चौकात रविवारी ५ मे रोजी सकाळी 'द नागपुरी स्ट्रीट' चे आयोजन केले होते. महाराष्ट्र दिन सप्ताह निमित्य आपले नागपूर, आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागपूरची खरी ओळख दाखवण्याकरीता बातचीत डॉट कॉमने हा पुढाकार घेतला असून महाराष्ट्रीयन आणि हिंदू संस्कृतीला साजेल असे नवीन उपक्रम यावेळी करण्यात आले. महत्वाचे म्हणजे भगवान श्री हनुमान, श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर योगा, झुंबा आणि दंड कलेसारख्या उपक्रमांचे सादरीकरण केले. इतकेच नाही तर भोसले व्यायाम शाळेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कुठे तरी लुप्त होत चाललेली शिवकालीन भारतीय युद्ध कला देखील सादर केली. याशिवाय अवघ्या दोन ते तीन तासात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील इथे साकारण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करून करण्यात आली. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
यांचे सहकार्य लाभले
बातचीत डॉट कॉम संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला संतीचा गणपती, महारुद्र युवा प्रतिष्ठान, योगा लाईफ सेंटर, स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था, चरैवेटी फाउंडेशन, श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर, लेवल अप जिम्नॅस्टिक अकॅडमी, फोटोहब स्टुडिओ, इलाईट ३६० डिग्री, अरिहंत मेवा ॲण्ड किराणा भंडार, गजवक्र ध्वज पथक नागपूर, अविज फिटनेस स्टुडिओ, भोसले व्यायाम शाळा, एसआर ग्राफिक्स, डीजे दिगेश आणि स्टार इव्हेंटचे सहकार्य लाभले.