सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले; पायलट जखमी

    03-May-2024   
Total Views |
- जयंत पाटीलही थोडक्यात बचावल्याची माहिती
 
Helicopter Crashes which Arrived To Pick Up Shiv Sena UBT Leader Sushma Andhare
 (Image Source : Twitter/ Screengrab)
 
मुंबई :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (युबीटी) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena UBT Leader Sushma Andhare) यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील महाड शहरात कोसळल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी लॅण्डिंगदरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलट जखमी झाला असून सुषमा अंधारे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यासाठी युबीटी नेत्या सुषमा अंधारे आज सकाळी हेलिकॉप्टरने बारामतीला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर महाड येथे आले होते. सकाळी 9.30 च्या सुमारास वैमानिकाने महाड येथील तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरण्याचा प्रयत्न केला. पण याचदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले.
 
 
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेबाबत माहिती देतांस सांगितले की, शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरला जवळ येत असताना अपघात झाला. हेलिकॉप्टरच्या पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुषमा अंधारे पूर्णपणे सुरक्षित आहेत, कारण त्या हेलिकॉप्टरमध्ये चढल्याही नाहीत. महत्वाचे म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत. तसेच हे हेलिकॉप्टर कशामुळे क्रश झाले याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
 
जयंत पाटीलही थोडक्यात बचावले
मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा अंधारे यांना हे हेलिकॉप्टर घ्यायला आले होते, त्याचा हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईला पोहोचले. त्यांना सोडल्यानंतर हे हेलिकॉप्टर महाडला निघाले आणि नंतर सुषमा अंधारे यांना घेऊन ते बारामतीला जाणार होते. अर्थातच जयंत पाटील या संकटातून थोडक्यात बचावले असेच म्हणावे लागेल.