काठमांडू : नेपाळमध्ये सोमवारी दुपारी पुन्हा एकदा जोरदार भूकंप झाला आहे. यावेळी रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी नोंदवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे नेपाळमध्ये तीन दिवसातील हा दुसरा भूकंप आहे. इतकेच नाही तर राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये देखील या भूकंपामुळे जोरदार धक्के जाणवले आहेत. या धक्क्यांमध्ये नागरिकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. या भूकंपामुळे अद्यापतरी कोणत्याही नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४.१४ वाजताच्या सुमारास नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती. तसेच हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला.
यापूर्वी शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४० च्यापश्चिम नेपाळमध्ये जोरदार भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचे स्वरूप तीव्र असल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. या भूकंपामुळे जवळपास १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.