काठमांडू :
पश्चिम नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार भूकंप (Nepal Earthquake) झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे स्वरूप तीव्र असल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर १६६ लोक जखमी झाले आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती सर्व मदत करेल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या दुर्घटनेतील जखमीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 'नेपाळमधील भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि नुकसान यामुळे तीव्र दुःख झाले आहे. नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे आणि शक्य असेल ती सर्व मदत करण्यासाठी सज्ज आहे. या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबियांप्रति सहवेदना तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशा शुभकामना दिल्या.'
शुक्रवारी रात्री ११.४७ च्या सुमारास नेपाळच्या पश्चिम भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजण्यात आली आहे. नेपाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट जिल्ह्यात १०५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८१ लोक जखमी झाले आहेत. तसेच रुकुम पश्चिममध्ये ३८ लोकांचा मृत्यू झाला असून ८५ जखमी झाले आहेत.
नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातही सुमारे ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे.
नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर स्थानिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड तातडीने जाजरकोट येथे पोहोचले आणि त्यांनी या भागात झालेल्या भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली.