नवी दिल्ली: अनेकदा वडील हयात नसताना त्यांच्या संपत्तीवरून मुलगा आणि मुलगी यांच्यात वाद निर्माण होतो. याच संदर्भात सर्वोच न्यायालयाने आज एक निकाल दिला आहे. तामिळनाडूतील एका खटला प्रकरणी निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीत मुलींच्या हक्काबाबत महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.
एखादी व्यक्ती संयुक्त कुटुंबात राहत असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला, तर त्याच्या मालमत्तेवर त्यांची मुलगी उत्तराधिकारी असेल, मुलीचा तिच्या वडिलांच्या भावाच्या मुलापेक्षा म्हणजे मुलीच्या चुलत भावापेक्षा हिस्से वाट्यामध्ये प्राधान्य दिले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ लागू होण्यापूर्वी मालमत्ता वाटा वितरणालाही अशी व्यवस्था लागू होईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नेमके प्रकरण काय?
संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या एका व्यक्तीचे १९४९ मध्ये निधन झाले. त्यांनी स्वतःच्या आणि विभाजित संपत्तीसाठी कोणतेही मृत्यूपत्र तयार केले नव्हते. त्याच्या संपत्तीवरून वाद झाला आणि वारसदारांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मद्रास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या भावाच्या मुलांना त्यांचा संपत्तीत हक्क दिला होता, याच निकालाला आव्हान देत याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुलीचे वारस हे खटला लढवत होते. या प्रकरणावर सुनावणी करीत न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने आज ५१ पानाचा निकाल दिला.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.