
Image Source:(Internet)
पालघर : पालघर येथील रेल्वे रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेनेने कठोर कारवाई केली आहे. जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. व्हिडिओमध्ये शहरप्रमुख राहुल घरत हे कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावताना दिसत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर पालघर पोलिसांनी कारवाई करत राहुल घरत यांना अटक केली.
या प्रकरणी कुंदन संखे आणि राहुल घरत यांच्यासह एकूण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयितांचा शोध आणि चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत हिंसाचाराचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाकडून सात पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शिवसेनेच्या या निर्णयामुळे पालघरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पक्षशिस्त भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे.