एम्समध्ये प्रवेशाचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; बनावट कागदपत्रे दाखवत मेडिकल सीटचे आश्वासन

    28-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका कुटुंबाकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा प्रकार नागपुरातील कळमना परिसरात समोर आला आहे. एम्ससह नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने कथित बनावट कागदपत्रेही दाखवल्याचा आरोप आहे. मात्र पैसे दिल्यानंतरही मुलीला कुठेही प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कळमना परिसरातील दिनेश ठाकरे यांच्या मुलीने NEET-UG परीक्षा दिली होती. याच दरम्यान मागील वर्षी १ ऑगस्टपासून भरतवाडा येथील दुर्गानगर परिसरातील आशीष गोसावी हा ठाकरे कुटुंबाच्या संपर्कात आला. त्याने मुलीला प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला. एम्ससह इतर नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये जागा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

प्रवेश प्रक्रिया, कॉलेजची फी आणि इतर शुल्कांच्या नावाखाली आरोपीने ठाकरे यांच्याकडून वेगवेगळ्या वेळी रक्कम घेतली. मुलीच्या प्रवेशाची अपेक्षा असल्याने कुटुंबीयांनी त्याच्यावर विश्वास ठेवत एकूण १० लाख रुपये दिले.

रक्कम दिल्यानंतरही मुलीला कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. याबाबत कुटुंबीयांनी आरोपीकडे विचारणा केली असता तो सतत टाळाटाळ करू लागला. कधी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे, तर कधी इतर कारणे सांगून त्याने वेळ मारून नेल्याचा आरोप आहे. बराच काळ उलटूनही प्रवेश झाला नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत.

अखेर दिनेश ठाकरे यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आशीष गोसावीविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दाखवलेली कथित बनावट कागदपत्रे आणि १० लाख रुपयांच्या व्यवहाराची पोलीस चौकशी करत आहेत.