शिवसेना प्रकरणातील विलंबाचा परिणाम पाहिलाच;पक्ष-चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

    24-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यास त्याचा निर्णय लांबवणे निवडणूक प्रक्रियेसाठी घातक ठरू शकते, अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नाव आणि ‘फूल व गवत’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या आव्हानावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

ममता बॅनर्जी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उशिरा घेण्यात आल्याचा युक्तिवाद केला. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने त्यात थेट हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय अंतरिम स्वरूपाचा असल्याने निवडणूक आयोगाने प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन ते लवकर निकाली काढावे, असे निर्देश देता येतील, असे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले.

याच सुनावणीदरम्यान दुसऱ्या गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील वादाचा दाखला दिला. त्यावर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी, “शिवसेनेच्या बाबतीत विलंबामुळे काय परिणाम झाला, हे आपण पाहिलेच आहे,” अशी टिप्पणी केली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार आहे.