शेख समीरच्या शोधासाठी क्राइम ब्रँचसह पोलिसांची अनेक पथके सक्रिय

Image Source:(Internet)
नागपूर : शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १० मधून मकोका प्रकरणातील आरोपीने पलायन केल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. शेख समीर शेख रहीम असे फरार आरोपीचे नाव असून, खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गँगवार प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. उपचारासाठी त्याला १६ सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास समीर शौचालयात गेला. यावेळी त्याने शौचालयाची खिडकी तोडून तेथून पलायन केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच क्राइम ब्रँच, बीट मार्शल आणि स्थानिक पोलिसांची पथके तातडीने त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.
समीरविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, न्यू कामठी पोलीस ठाण्यात सात, कलमना येथे चार, तर गणेशपेठ, तहसील, नंदनवन आणि खापरखेडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. लूटमार, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि गँगवाराशी संबंधित गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.
गंभीर गुन्ह्यांतील आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, सुरक्षेतील निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.