राज्यातील शेतकरी संकटात; नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत;फडणवीस यांचे विधान

    19-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीपिकांवर मोठा परिणाम होत आहे. पावसाअभावी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, परिस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात प्राथमिक पाहणी करून त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. संबंधित मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली पाणी, चारा आणि वीज यासह तातडीची मदत उपलब्ध करून दिली जाईल.

चाऱ्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आधीच चारा लागवड करण्यात आली आहे. ज्या भागात चाऱ्याची कमतरता भासेल, तिथे पुरवठा केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सायंकाळच्या वेळी अतिरिक्त वीज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंगल फेजमुळे काही भागात वीजपुरवठ्याची अडचण होती, तिथेही वीज देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून तीन याद्या तयार झाल्या आहेत. उर्वरित याद्यांचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील काही लहान धरणांमध्ये पाणी कमी आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणी राखून ठेवण्यात येत आहे. पाणी उपलब्ध असलेल्या भागात रब्बी हंगामाचे नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.