महाराष्ट्रात ८ हजार १०० पोलिसांची भरती; नववर्षात प्रक्रिया सुरू होणार

    15-Sep-2026
Total Views |
जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश; सोलापूर जिल्ह्यात ११७ जागा

Image Source:(Internet)

नागपूर :
महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांच्या पदांची माहिती गृह विभागाने मागविली असून, राज्यभरात सुमारे ८ हजार १०० पदे रिक्त होणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ११७ पदांचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२७ पासून नवीन पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची संभाव्य मुदत १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ अशी असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने पोलिस भरती होत आहे. गतवर्षी तब्बल १५ हजार ६३१ पदांसाठी भरती करण्यात आली होती. मागील भरतीत निवड झालेल्या नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण जूनपासून सुरू असून, हे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुढील रिक्त पदांसाठी भरतीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.