नागपुरात हुक्का पार्लरवर क्राईम ब्रांचचा छापा; कुलूप तोडून २३ ग्राहकांना पकडलं, तिघे अटकेत

    15-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सीताबर्डीतील लक्ष्मी भवन चौक परिसरात सुरू असलेल्या ‘सेकंड फ्लोअर कॅफे’ हुक्का पार्लरवर क्राईम ब्रांचने रात्रीच्या वेळी छापा टाकत मोठी कारवाई केली. क्राईम ब्रांचच्या युनिट-२, युनिट-३ आणि एनडीपीएस पथकाने संयुक्तपणे ही धाड टाकली.

पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचताच पार्लर संचालकांनी बाहेरून कुलूप लावल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचांसमक्ष पोलिसांनी कुलूप तोडून पार्लरमध्ये प्रवेश केला. आत २३ ग्राहक प्रतिबंधित तंबाखूयुक्त हुक्का सेवन करताना आढळून आले.

छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य जप्त केले. यामध्ये १९ हुक्का पॉट, १० पाइप, २० चिलम आणि प्रतिबंधित तंबाखूची पाकिटे असा एकूण सुमारे २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

या प्रकरणी सनी विकास बोरकर, सार्थक बाबाराव पखाले आणि हर्ष नरेश दुर्वे या तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय हुक्का सेवन करणाऱ्या २३ ग्राहकांसह जागा मालकाविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.