
Image Source:(Internet)
पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई करत FDAच्या पथकाने पनीर आणि खव्याचा मोठ्या प्रमाणातील संशयित साठा ताब्यात घेतला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तब्बल चार ट्रकमधून हा साठा पुण्यात आणण्यात आला होता. कारवाईदरम्यान FDAच्या अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
हा साठा परराज्यातून पुण्यात आणण्यात आल्याचा संशय असून, त्याचा स्रोत, गुणवत्ता आणि त्यामध्ये भेसळ आहे का, याची तपासणी आता केली जात आहे. बुधवार पेठ परिसरातून पुण्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पनीर आणि खव्याचा पुरवठा होत असल्याची माहिती असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, पनीर, खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही धोका टाळण्यासाठी FDAकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.