शेतकऱ्यांना हेक्टरी ५० sहजारांची मदत देण्याची मागणी; पावसाअभावी खरीप धोक्यात

Image Source:(Internet)
नागपूर : पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भातील शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांनी गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख उपस्थित होते. शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून पिकांची आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातही पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. विदर्भातील अनेक भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता असल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची तूट मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांना फटका बसला असून, त्याचा परिणाम पुढील रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
पार्थ पवारांबाबत भाजपवर निशाणा-
पार्थ पवार आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजप मित्रपक्षातील नेत्यांनाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणते, हे पार्थ पवारांना भविष्यात समजेल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, देवरी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहाराचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण स्पष्ट करा-
२३ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानेही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. एफडीए परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या घटनेनंतरच हा निर्णय घेण्यात आला का, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पेपरफुटीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही पवार यांनी सांगितले.