
Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा यंदा राजधानी दिल्लीऐवजी गुजरातमधील केवाडिया येथे आयोजित करण्याच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, “मुंबईनंतर आता दिल्लीचंही महत्त्व संपवण्याचा खटाटोप सुरू आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर आयोजित केला जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुरस्कार सोहळा गुजरातमध्येच का आयोजित करण्यात आला, असा सवालही त्यांनी केला.
हा पुरस्कार सोहळा गुजरातमध्येच का?
राज ठाकरे यांनी म्हटले की, देशाच्या आर्थिक राजधानीचे म्हणजेच मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच आता देशाच्या राजधानीचे महत्त्वही हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे ठिकाण बदलण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या महाराष्ट्रात हा सोहळा का आयोजित करण्यात आला नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रासोबतच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होते. त्यामुळे या राज्यांपैकी एखाद्या ठिकाणी सोहळा का आयोजित केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोदी-शाहांवर थेट निशाणा-
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट टीका केली. कॉमनवेल्थ स्पर्धा, २०२३ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या भेटी आणि गिफ्ट सिटीसारख्या विविध मुद्द्यांचा दाखला देत त्यांनी अनेक मोठे कार्यक्रम आणि प्रकल्प गुजरातकडे वळवले जात असल्याचा आरोप केला.
“या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे? या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा गुजरातमध्ये हलला?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.देश आज उभा राहिला आहे तो केवळ एका राज्याच्या योगदानामुळे नव्हे, तर देशातील प्रत्येक प्रांतातील नागरिकांच्या अनेक पिढ्यांच्या त्याग आणि योगदानातून, असेही त्यांनी म्हटले.
‘कलासक्त’ नसल्याची टीका-
सध्याचे सत्ताधीश कलासक्त नसल्याची टीका करत राज ठाकरे यांनी सरकारवर प्रचारकी चित्रपटांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. निवडणुका जिंकणे हीच त्यांची एकमेव कला असल्याचा टोला त्यांनी लगावला. चित्रपटसृष्टीशी सरकारचा संबंध केवळ प्रचारकी सिनेमे तयार करून घेणे आणि त्यांना पुरस्कार देण्यापुरताच मर्यादित असल्याची टीकाही त्यांनी केली.
कलाकारांनी आवाज उठवावा-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची दिल्लीतील परंपरा मोडण्याच्या निर्णयाविरोधात देशातील कलाकारांनी भूमिका घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. “मुद्दा केवाडिया किंवा इतर शहराचा नाही; देशाच्या राजधानीत या पुरस्काराची जी उज्वल परंपरा आहे, ती का मोडली जात आहे हा मुद्दा आहे,” असे त्यांनी म्हटले.
दक्षिण भारतातील चित्रपटप्रेमी राज्यांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त करताना महाराष्ट्रानेही कणखर भूमिका घेण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले.
गुजरातपुरते उरण्याची गत होऊ नये-
गुजराती बांधवांनाही राज ठाकरे यांनी आवाहन केले. भाषिक नेत्यांची सत्ता असल्याच्या भावनेतून वाहवत जाऊ नका, असे सांगत त्यांनी भविष्यात इतर राज्यांतील नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर झालेल्या अन्यायाचा हिशेब ठेवतील, असा इशारा दिला.
महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी कणखर भूमिका घेतली नाही, तर या दख्खन प्रांताची ओळख आणि अस्मिता यावरच वरवंटा फिरवतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ सांस्कृतिक विषय न राहता महाराष्ट्र विरुद्ध गुजरात आणि केंद्राच्या धोरणांवरील राजकीय चर्चेचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.