
Image Source:(Internet)
नागपूर: महिलांना सहज कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात तहसील पोलिसांनी मुख्य आरोपी मंदा गुमगावकर हिला अटक केली असून, तिच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदा गुमगावकर हिने सुमारे ३९ महिलांना सहकारी संस्था आणि बचत गटामार्फत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून दोन हजार रुपये तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली.
त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलांच्या नावाने एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेत खाती उघडण्यात आली. महिलांना याची कोणतीही माहिती न देता या खात्यांद्वारे तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम वळविण्यासाठी ‘म्यूल अकाउंट’ म्हणून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तपासादरम्यान शांतिनगर परिसरातील एका महिलेच्या नावाने उघडलेल्या खात्यातून सुमारे १७ लाख ८५ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले. तहसील आणि शांतिनगर पोलिसांनी संयुक्त तपास करून मुख्य आरोपीला अटक केली.
न्यायालयाने मंदा गुमगावकर हिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, फरार आरोपी शुभमचा शोध सुरू आहे. या प्रकरणामागील सायबर रॅकेट, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि इतर संबंधित आरोपींचा सहभाग याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.