रामटेकमध्ये हिट अँड रन : भरधाव कारची दुचाकीला धडक;,चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा मृत्यू, एक गंभीर
06-Aug-2026
Total Views |

Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
ही दुर्घटना रामटेक-अंबाला मार्गावरील हॉटेल शिकारा समोर घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर दूर फेकले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित लालचंद वाघ आणि रोहित लालचंद चौधरी हे दोघे बोरडा सराखा येथून दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होते. त्याचवेळी समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या अपघातात अमित वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर रोहित चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रामटेक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मृत अमित वाघ यांचा अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.