भाजपाची स्वातंत्र्यदिनानिमित्त देशव्यापी तिरंगा यात्रा; ९ ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध कार्यक्रम

    06-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ९ ते १७ ऑगस्टदरम्यान देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाचा प्रमुख कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी मुंबईत होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिरंगा हातात घेऊन यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. या यात्रेत मुंबई आणि परिसरातील सुमारे २० ते २५ हजार युवक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपाच्या या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा, देशभक्तीपर कार्यक्रम आणि जनसंपर्क उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आपल्या-आपल्या जिल्ह्यांतील कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपाच्या मते, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः युवकांचा सहभाग वाढविण्यावर पक्षाने भर दिला असून, मोठ्या प्रमाणात तरुणांना या यात्रेत सहभागी करून घेण्याची तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, अलीकडील काळात विविध शैक्षणिक आणि युवकांच्या प्रश्नांवर देशभरात आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर युवकांशी संवाद अधिक दृढ करण्यासाठी भाजपाने या अभियानाची आखणी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.