लैंगिक अत्याचार 2013 प्रकरण : तरुण तेजपाल दोषी, मुंबई उच्च न्यायालयाकडून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

    06-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पणजी : 2013 मधील गाजलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवत 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोन कलमांअंतर्गत प्रत्येकी 10 वर्षांची, तसेच आणखी एका प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, शिक्षेची अंमलबजावणी कायद्यानुसार करण्यात येणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
2013 मध्ये तहलका मासिकाच्या तत्कालीन महिला सहकाऱ्याने तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे आरोप केले होते. तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्यात आयोजित थिंकफेस्ट कार्यक्रमादरम्यान एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये दोन वेगवेगळ्या प्रसंगी तेजपाल यांनी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

पीडितेच्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुण तेजपाल यांना अटक केली. त्यांच्याविरोधात बलात्कार, लैंगिक अत्याचार, तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग यांसह विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले.

ट्रायल कोर्टाने दिली होती निर्दोष मुक्तता-

या प्रकरणाची दीर्घकाळ सुनावणी झाल्यानंतर 2021 मध्ये गोवा येथील सत्र न्यायालयाने (ट्रायल कोर्ट) पुराव्याअभावी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती.

उच्च न्यायालयाने निकाल पलटवला-
ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले. जवळपास पाच वर्षे सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले आणि 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.

देशभरात चर्चेत राहिलेल्या या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.