
Image Source:(Internet)
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय ११ सदस्यीय उच्चस्तरीय समिती अमरावतीत दाखल झाली आहे. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने बुधवारी सकाळपासून चौकशीला सुरुवात केली.
समितीने सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नेमकी घटना कशी घडली, याचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी त्या वेळी ड्युटीवर असलेल्या परिचारिका, वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षकांची माहिती घेण्यात आली. तसेच घटनेशी संबंधित साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले.
अग्निकांडातून बचावलेल्या ३६ बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार रुग्णालयांनाही समितीने भेट दिली. तेथील बालकांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, एसीएस डॉ. अरुण साळुंके तसेच एसएनसीयूमध्ये कार्यरत बालरोगतज्ज्ञांकडूनही घटनेशी संबंधित माहिती घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत समिती सदस्यांनी प्राथमिक माहितीचा आढावा घेतला. गुरुवारीही समितीची बैठक होणार असून, चौकशीच्या पुढील टप्प्यात आणखी माहिती संकलित केली जाणार आहे.
चार महिन्यांपूर्वीही व्हेंटिलेटरमध्ये बिघाड?
दरम्यान, ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, त्यामध्ये चार महिन्यांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. बिघाडामुळे दोन दिवस व्हेंटिलेटरचा वापर बंद ठेवण्यात आला होता. रुग्णालय प्रशासनाने ॲन्युअल मेंटेनन्स विभागाला माहिती दिल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि दोन दिवसांनी पुन्हा वापर सुरू करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित व्हेंटिलेटरची दुरुस्ती नेमकी कशी करण्यात आली, त्याची तांत्रिक तपासणी झाली होती का आणि पुन्हा वापरण्यापूर्वी कोणती खबरदारी घेण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुषमा अंधारेंकडून प्रशासनावर सवाल-
ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
शासकीय रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरचा वापर का सुरू आहे, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. संबंधित व्हेंटिलेटरच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अद्याप घटनास्थळी का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी सरकारवर टीका केली. या दुर्घटनेतील बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभागाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेवर सरकारला धारेवर धरत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.