
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यात गणेशोत्सवापासून सणासुदीच्या पर्वाला सुरुवात होत असताना मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ होणार आहे. या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या काळातील अन्नसुरक्षेसाठी विशेष नियमावली तयार केली जाणार आहे.
यंदा प्रथमच केवळ एखाद्या विशिष्ट सणापुरती कारवाई मर्यादित न ठेवता वर्षभरातील विविध धर्मीय प्रमुख सणांचे स्वतंत्र कॅलेंडर तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कॅलेंडरनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी आणि कारवाईचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. यासंदर्भातील विशेष आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.
सणाच्या तीन टप्प्यांत तपासणी-
या नियोजनात दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसह विविध धर्मीय सणांचा समावेश केला जाणार आहे. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करून सणापूर्वी, सणादरम्यान आणि सणानंतर अशा तीन टप्प्यांत अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने त्यांच्या गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. भेसळ आढळल्यास किंवा अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यावसायिकांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
जास्त साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांबाबतही आवाहन-
दरम्यान, सणांचा आनंद घेताना नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला देण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात केवळ गोड आणि तेलकट पदार्थांवर भर न देता पौष्टिक व आरोग्यदायी अन्नपदार्थांना प्राधान्य द्यावे, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत मिठाईच्या दुकानांपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत अन्नसुरक्षेच्या नियमांवर प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे.