फ्लोरिडातील भीषण अपघातात तेलंगणातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; राहुलचा शेवटचा फोन ठरला अखेरचा संवाद

    26-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात तेलंगणातील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी ब्रेवर्ड काउंटीतील इंटरस्टेट-९५ महामार्गावर हा अपघात झाला. तिघेही विद्यार्थी अर्धवेळ नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी कारमधून प्रवास करत होते.

प्रवासादरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. या दुर्घटनेत चालकासह पुढील सीटवर बसलेल्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यानेही अखेरचा श्वास घेतला. अन्य दोन मृत विद्यार्थ्यांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मृत राहुल हा तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील नविपेट येथील रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वीच उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला होता. त्याने एमएसचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पुढील शिक्षणासाठी साउथ फ्लोरिडा विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. शिक्षणासोबतच तो नोकरीच्या शोधातही होता.

राहुलच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील हरिबाबू यांनी मुलाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणून अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, अपघाताच्या काही वेळ आधीच राहुलने आईशी फोनवर संवाद साधला होता. मित्र त्याला घेण्यासाठी आले असल्याचे सांगून त्याने फोन ठेवला. कुटुंबीयांशी झालेला तोच त्याचा शेवटचा संवाद ठरला.

दरम्यान, दुर्घटनेनंतर अमेरिकेतील तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही संस्था फ्लोरिडा प्रशासनाच्या संपर्कात आहे. मृतदेह भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत गेलेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने तेलंगणातील त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.