
Image Source:(Internet)
नागपूर : वाठोडा परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबारात घराच्या काचा फुटल्या असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोळीबार झाला त्यावेळी शुभम मोटघरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय घरातच उपस्थित होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात तसेच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास सुरू आहे.
गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, घटनेनंतर वाठोडा परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.