
Image Source:(Internet)
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि वसतिगृहांतील समस्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आवाहन केले.
वसतिगृहांच्या नियमांवर राहुल गांधींचा आक्षेप-
दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहेत. मात्र, वसतिगृह प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा लागू केल्याने उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले.
वसतिगृहांमध्ये स्वच्छता, अन्न, आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी सर्पदंशासारख्या गंभीर घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
विद्यार्थिनींच्या वैद्यकीय तपासणीवरही प्रश्न-
महिला वसतिगृहांमध्ये सुट्टीनंतर परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीच्या नियमावरही राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थिनींच्या गरोदरपणाची तपासणी केली जात असल्याचा दावा करत हा प्रकार अपमानास्पद आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाला धक्का देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आदिवासी विकास मंत्र्यांचा पलटवार-
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नागपूर आणि चंद्रपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण राहुल गांधी महाराष्ट्रात येण्यापूर्वीच मागे घेण्यात आले होते, असा दावा वुईके यांनी केला.
वसतिगृह प्रवेशाची ३० वर्षांची वयोमर्यादा विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करूनच करण्यात आली असून विद्यार्थिनींची गरोदरपणाची तपासणी केली जाते, हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुट्टीवरून परतणाऱ्या विद्यार्थिनींकडून केवळ आरोग्याच्या कारणास्तव वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र घेतले जाते, असेही वुईके यांनी सांगितले.
आश्रमशाळांमधील समस्यांवरूनही त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत संबंधित काही संस्था काँग्रेसच्या माजी नेत्यांच्या असल्याचा दावा केला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राहुल गांधी विरुद्ध राज्य सरकार असा नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.