
Image Source:(Internet)
अमरावती : अमरावतीतील रुग्णालयात नवजात बाळांच्या मृत्यूच्या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्यासह दोन आमदारांना घटनेची माहिती घेण्यासाठी अमरावतीत पाठविल्याचे अंधारे यांनी सांगितले. चौकशी समितीतील अधिकाऱ्यांचा तब्बल दोन तास शोध घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रुग्णालयाचे अग्निसुरक्षा परीक्षण आणि विद्युत सुरक्षा परीक्षणाचे अहवालही आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
‘धोका माहिती असताना कारवाई का नाही?’
रुग्णालयात अशी दुर्घटना घडण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सकांना आधीपासून माहिती होती, असा आरोप करत अंधारे यांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रुग्णालयातील स्थानिक पद्धतीने करण्यात आलेले विद्युत जोडणीचे काम या दुर्घटनेमागे कारणीभूत असण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले.
अंधारे यांनी भंडारा जिल्ह्यातील यापूर्वीच्या रुग्णालय दुर्घटनेचा दाखला देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः घटनास्थळी गेले होते आणि चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
‘बावनकुळे घटनास्थळी का आले नाहीत?’
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर घटनास्थळी आले नाहीतच; मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत त्यांनी बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. पालकमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाशिवाय दुसरे काही दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शिलर कंपनीकडून रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या व्यक्तीचे सरकारमधील कोणाशी संबंध आहेत का, याचीही चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली. पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
या प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना जाब विचारल्याची माहिती अंधारे यांनी दिली.