नंदनवनमध्ये टोळी संघर्षाचा थरार; कुख्यात अक्षय वंजारीची हत्या

    26-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नंदनवन परिसरात टोळी संघर्षातून कुख्यात गुन्हेगार अक्षय वंजारी याची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. डोळ्यांत मिरची पूड टाकून त्याच्यावर चाकू आणि लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अक्षय वंजारी हा मित्रांसोबत सोमरस बारमध्ये बसला होता. पत्नीचा फोन आल्यानंतर तो बारच्या खाली आला. यावेळी वंदना लांजेवार हिने अक्षयच्या डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रदीप आखरे, प्रशांत आखरे आणि सूरज लांजेवार यांच्यासह इतरांनी त्याच्यावर हल्ला केला.

हल्ल्यातून सुटका करून अक्षय पुन्हा बारमध्ये गेला आणि मित्रांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण खाली आले असता आरोपींनी पुन्हा त्याच्यावर हल्ला केला. प्रदीप आखरे याने लोखंडी हत्याराने, तर प्रशांत आखरे आणि सूरज लांजेवार यांनी चाकूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर आरोपींनीही अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अश्विन रहांगडाले याने अक्षयला वाचविण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत अक्षयला अश्विनने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी अक्षयचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सूरज लांजेवार, वंदना लांजेवार, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप आखरेसह अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुखबिरीच्या संशयातून या हत्येचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. २१ ऑगस्ट रोजी सूरज लांजेवारचा भाऊ आकाश याला चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. अश्विन रहांगडाले याने आकाशबाबत पोलिसांना माहिती दिल्याचा सूरजला संशय होता. याच कारणातून मंगळवारी सकाळी दोन्ही गटांत वाद आणि धमकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मृत अक्षय वंजारी याच्याविरुद्ध मोक्का, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईसह अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भातही त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हत्येनंतर नंदनवन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.