नागपुरात वडिलांकडूनच १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; जीवे मारण्याचीही दिली धमकी

    26-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीचे तिच्याच वडिलांनी सुमारे वर्षभर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास मुलीला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वडील मुलीला धमकावत तिच्यावर कथित अत्याचार करत होते. भीतीपोटी मुलगी बराच काळ हा प्रकार कुणालाही सांगू शकली नाही. अखेर धाडस करून तिने आईसमोर आपल्यासोबत घडलेला प्रकार उघड केला.

यानंतर आई आणि मुलीने सदर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची ओळख गोपनीय ठेवली असून, तिचे जबाब आणि प्रकरणाशी संबंधित बाबींचा तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.