शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं? पार्थ पवारांनी नेत्यांना काय सांगितलं? बैठकीत मोठी चर्चा

    22-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. जय पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बाबी तसेच पक्षातील अंतर्गत मतभेदांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील वाद मिटवून एकजुटीने जनतेसमोर जाण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शरद पवारांसोबतच्या भेटीचा मुद्दा चर्चेत-
दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली होती. या भेटीत तब्बल तीन तास चर्चा झाली होती. त्यामुळे या भेटीला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं.

आजच्या बैठकीत पक्षातील नेत्यांनी पार्थ पवार यांना शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, दोघांमध्ये काय ठरलं, याबाबत विचारणा केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी या प्रश्नाला फारसं राजकीय महत्त्व न देता “फार काही नाही, वैयक्तिक विषयांवर चर्चा झाली,” असं सांगितल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीमागे नेमकं काय राजकीय गणित होतं, याबाबतची उत्सुकता मात्र कायम आहे.

सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत-
दरम्यान, सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचाही बैठकीत मुद्दा उपस्थित झाला. त्यांच्या पत्रातील भूमिकेवर पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

पक्षात काही अडचण किंवा समस्या असल्यास ती थेट वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. मात्र निवडणूक आयोगाला अशा प्रकारे पत्र लिहिणं योग्य नाही, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. या प्रकरणी पक्षाकडून लवकरच उत्तर दिलं जाणार असून, सच्चिदानंद सिंह यांच्यावर कायदेशीर तसेच पक्षांतर्गत कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत संघटनात्मक चर्चा-

बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीची माहिती दिली. संघटनात्मक पातळीवर व्यापक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील इतर भागांमधील पक्षाच्या संघटनेची स्थिती, आगामी कामकाज आणि स्थानिक पातळीवरील बैठका यावर चर्चा झाल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं. सच्चिदानंद सिंह यांच्याविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

आमच्यात कधी दुफळी नव्हती-
पक्षातील अंतर्गत दुफळीबाबत प्रश्न विचारला असता सुनील तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावली. “तुमच्या कल्पनेतच दुफळी असेल तर काय बोलणार? आमच्यात कधी दुफळी नव्हती,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या बैठकीला प्रशांत किशोर उपस्थित नव्हते, अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.

एकूणच, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीपासून सुरू झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर आजची राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पार्थ पवार यांनी भेटीबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने या भेटीमागील राजकीय संदेशाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे.