नागपूर पोलिसांची बॉम्ब धमकीनंतर शाळांवर नजर; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

    22-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील काही शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेबाबत खबरदारी वाढवली आहे. १८ ऑगस्ट रोजी शहरातील सुमारे १६ शाळांना धमकीचे ई-मेल पाठविण्यात आले होते. या संदेशांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाची नोंद सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे देण्यात आली आहे. धमकीचे ई-मेल नेमके कुठून पाठविण्यात आले, त्यामागे कोण आहे आणि त्यामागील उद्देश काय, याचा तपास पोलिसांकडून तांत्रिक पद्धतीने सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेण्यात आली. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुमारे १५० प्रतिनिधी प्रत्यक्ष सहभागी झाले, तर जवळपास ५०० प्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. बैठकीत शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले. कोणतीही संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने प्रमाणित कार्यपद्धतीनुसार सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.

शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनीही सुरक्षेशी संबंधित अडचणी आणि सूचना पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. दरम्यान, धमकीच्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.