खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाला वेगळं वळण; ‘आयफोनमुळेच आत्महत्या’वर पोलिसांचा मोठा खुलासा

    22-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुरुवातीला कुणालने आयफोन 15 खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी या चर्चांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या घटनेला आता वेगळं वळण मिळालं आहे. कुणाल चांदवडे याला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्याच्या कुटुंबीयांनी पाहिलं होतं. वडील ट्रकचालक तर आई गृहिणी असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण होती. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आई-वडील मेहनत घेत होते.

दरम्यान, कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदवडे पुढे गेले. यावेळी ते डोंगरावरून खाली पडले. मुलगा आणि पती डोंगरावरून पडताना पाहून आई संगीता चांदवडे यांनीही उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

‘आयफोनमुळेच आत्महत्या’ याला पोलिसांचा दुजोरा नाही-
या घटनेनंतर कुणालने आयफोन 15 घेतला होता आणि त्याच्या ईएमआयचा ताण असल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या दाव्यावर महत्त्वाची माहिती दिली आहे.

कुणालच्या आत्महत्येमागे आयफोन किंवा त्याच्या ईएमआयचा ताण कारणीभूत होता, हे सध्या स्पष्ट झालेलं नाही. घटनेला 24 तासही पूर्ण झालेले नसल्याने प्राथमिक तपासाच्या आधारे कोणताही ठोस निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

कुणाल तणावात होता; समजावण्याचा प्रयत्न सुरू होता-
पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल काही कारणामुळे तणावात होता. त्याची अडचण समजून घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न पोलिस आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले; मात्र प्रयत्नांना यश आलं नाही.त्यामुळे सध्या आयफोनच्या ईएमआयमुळेच कुणालने टोकाचं पाऊल उचललं, असं खात्रीशीरपणे सांगता येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर घटनेचे व्हिडीओ व्हायरल-
खवड्या डोंगरावरील या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, तपास पूर्ण होण्यापूर्वी व्हायरल व्हिडीओ किंवा सोशल मीडिया चर्चांच्या आधारे घटनेमागील कारण निश्चित करणं योग्य ठरणार नाही.कुणाल चांदवडे आणि त्याचे आई-वडील मुरलीधर व संगीता चांदवडे यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.