नागपूरसह महाराष्ट्रातील 16 शहरांत भारतगॅसची ‘लाइट झिप’ सेवा; बाहेरूनच कळणार सिलेंडरमधील गॅसचा स्तर

    22-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एक आधुनिक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि कोल्हापूरसह राज्यातील एकूण 16 शहरांमध्ये ‘भारतगॅस लाइट झिप’ (Bharatgas Lite ZIP) सेवा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेंतर्गत ग्राहकांना पारंपरिक लोखंडी सिलिंडरऐवजी फायबर कंपोझिट सिलिंडर उपलब्ध करून दिला जात आहे. वजनाने हलका आणि वापरण्यास सोपा असल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.

पारंपरिक सिलिंडरपेक्षा जवळपास निम्मं वजन-
घरगुती वापरातील लोखंडी सिलिंडर गॅस भरल्यानंतर वजनाने बराच जड होतो. त्यामुळे सिलिंडर उचलणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अनेक ग्राहकांसाठी त्रासदायक ठरते.

‘लाइट झिप’ अंतर्गत देण्यात येणारा कंपोझिट सिलिंडर फायबरग्लास तंत्रज्ञानावर आधारित असून तो पारंपरिक सिलिंडरपेक्षा जवळपास निम्मा हलका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हा सिलिंडर गंजरोधक असल्याने घराच्या फरशीवर किंवा टाइल्सवर गंजाचे डाग पडण्याची समस्याही कमी होणार आहे.

बाहेरूनच दिसणार गॅसचा स्तर-

या कंपोझिट सिलिंडरची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे त्याची ट्रान्सलूसंट रचना. त्यामुळे सिलिंडरमध्ये उरलेला गॅस बाहेरून पाहता येणार आहे.

यामुळे सिलिंडर नेमका कधी संपणार याचा अंदाज ग्राहकांना आधीच घेता येईल. गॅसचा स्तर कमी झाल्याचं दिसताच ग्राहक नवीन सिलिंडरची बुकिंग करू शकतील. त्यामुळे स्वयंपाकाच्या वेळी अचानक गॅस संपण्याची शक्यता कमी होणार आहे.

इंस्टंट कनेक्शन आणि एक्स्प्रेस होम डिलिव्हरी-

ग्राहकांच्या सोयीसाठी ‘लाइट झिप’ सेवेमध्ये डिजिटल आणि जलद वितरण व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. नव्या ग्राहकांना त्वरित गॅस कनेक्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच बुकिंगनंतर एक्स्प्रेस होम डिलिव्हरीची सुविधाही देण्यात येत असल्याने ग्राहकांना तुलनेने कमी वेळेत सिलिंडर घरपोच मिळण्याची अपेक्षा आहे.

सुरक्षिततेवरही भर-

नव्या कंपोझिट सिलिंडरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून सुरक्षा मानकांवरही भर देण्यात आला आहे. हलका, गंजरोधक आणि बाहेरून गॅसचा स्तर दिसणारा सिलिंडर हा पारंपरिक पर्यायाच्या तुलनेत अधिक सोयीस्कर ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये सुरू झालेल्या या सेवेमुळे शहरी आणि निमशहरी भागातील ग्राहकांना गॅस सिलिंडर वापराचा अधिक आधुनिक अनुभव मिळणार आहे. विशेषतः सिलिंडरचे वजन आणि गॅस किती शिल्लक आहे, या दोन्ही समस्यांवर ‘लाइट झिप’मुळे उपाय मिळण्याची अपेक्षा आहे.