नागपुरात चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

    22-Aug-2026
Total Views |

नागपूर : चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने १९ वर्षीय आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आजमी यांच्या न्यायालयाने शेख शहजाद शेख शाहिद, रा. वागदरा, इसासनी याला दोषी ठरविले. त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.

अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, ३ मे २०२४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने घराजवळ खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला जवळच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला.

घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर ९ मे २०२४ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी अभियोजन पक्षाने सादर केलेले दस्तऐवजी पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि पोलिस तपासाच्या आधारे आरोपीवरील आरोप सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

पोलिसांच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी आरोपपत्र दाखल केले. अभियोजन पक्षातर्फे अधिवक्ता आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली. हवालदार नितीन सिरसाट आणि गुरुदास ताडपल्लीवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.