मराठी भाषेच्या नियमाची कडक अंमलबजावणी; 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस

    21-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या व्यावसायिक चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून, मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

चालक आणि प्रवाशांमध्ये संवाद सुलभ व्हावा, तसेच प्रवाशांना सेवा घेताना भाषेची अडचण येऊ नये, हा या नियमामागील उद्देश असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईसह MMRमध्ये 604 चालकांना नोटीस-

मुंबई आणि उपनगरांसह MMR परिसरात परिवहन विभागाच्या पथकांनी विशेष तपासणी केली. या मोहिमेदरम्यान एकूण 3,995 रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 604 चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळून आले.

नियमांचे पालन करण्यासाठी या चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

इतर जिल्ह्यांत 664 चालकांवर कारवाई
मुंबई आणि उपनगर वगळता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही परिवहन विभागाने तपासणी केली. या भागात 4,222 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 664 चालकांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने नोटीस बजावण्यात आली.

अशा प्रकारे राज्यभरात तपासणीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 8,217 चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 1,268 चालक नियमांच्या कसोटीवर अपुरे ठरले आहेत.

मराठी शिकण्यासाठी चालकांना संधी-
दरम्यान, सरकारने यापूर्वीच अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. चालकांना भाषा आत्मसात करण्यासाठी वेळ आणि आवश्यक संधी दिली जात असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट करताना चालकांबाबत प्रशासनाची भूमिका सहानुभूतीची असल्याचे सांगितले. मात्र नियमांचे पालन करण्याची जबाबदारी चालकांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

30 सप्टेंबरपर्यंत तपासणी मोहीम-
ही विशेष तपासणी मोहीम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत चालकांना मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान मिळवण्यासाठी संधी दिली जाणार आहे.

मुदत संपल्यानंतरही एखादा चालक निर्धारित नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

सरकारने चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला असला तरी नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पुढील टप्प्यात कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा नियम आता अधिक गांभीर्याने लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.