सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव कडाडला; सोन्याने गाठला १.६२ लाखांचा टप्पा

    21-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. २१ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे तब्बल ४ हजार ३०० रुपयांनी वाढून १ लाख ६२ हजार रुपयांवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांतील हा उच्चांकी स्तर ठरला आहे.

२० ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे १ लाख ५८ हजार रुपये होता. त्यात एका दिवसात मोठी वाढ झाल्याने सोन्याच्या खरेदीदारांना मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत बाजारातही २१ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तेजी कायम असल्याचे बाजारातील अहवालातून दिसून येते.

चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, मौल्यवान धातूंच्या बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यामुळे सोन्याच्या दराला आधार मिळत आहे.

सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ जवळ येत असतानाच सोन्याच्या दराने घेतलेली ही झेप ग्राहकांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.