नागपुरात फार्म हाऊसवरील जुगार अड्ड्यावर क्राइम ब्रांचचा छापा; 16 जुगारी अटकेत

    19-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पावनगाव परिसरातील सिस्टर फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर क्राइम ब्रांचच्या युनिट-5 ने धडक कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून पैशांची बाजी लावत पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 16 जणांना ताब्यात घेतले. तर कारवाईदरम्यान 7 जण घटनास्थळावरून पसार झाले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह एकूण 24 लाख 63 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

क्राइम ब्रांच युनिट-5 ला सिस्टर फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी काही जण पैशांची बाजी लावत ताशांच्या पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून 16 जणांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच 7 जणांनी तेथून पळ काढला. कारवाईदरम्यान 72 हजार 750 रुपये रोख, 17 मोबाईल, दोन चारचाकी आणि सात दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय फरार आरोपींचे पाच मोबाईलही पोलिसांच्या हाती लागले.

जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत 24 लाख 63 हजार 750 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कलमना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.