नागपुरात एमडी तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई; ३४ ग्रॅमपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त

    18-Aug-2026
Total Views |
६.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे अटकेत, दोन संशयितांचा शोध सुरू

Image Source:(Internet)

नागपूर :शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एकाच रात्री दोन स्वतंत्र कारवाया केल्या. कोतवाली आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी ३४.१५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या दोन्ही कारवायांत एकूण ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाया केल्या. पहिली कारवाई महाल परिसरातील दसरा रोडवर मॅस्कॉट होंडा सर्व्हिस सेंटरसमोर करण्यात आली. पोलिसांनी शहजान शेख याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २० ग्रॅम एमडी आढळून आले. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहजानकडून मोबाईल फोन, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील शेख अर्शद उर्फ राजा हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दुसरी कारवाई कोराडी परिसरातील आर्यनगर येथील जगदंबा रेसिडेन्सीमध्ये करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने फरहान आयुब शेख याला अटक केली. त्याच्याकडून १४.१५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे एक लाख ४१ हजार रुपये आहे.

या कारवाईत वजनकाटा, रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणातील शाहिद अन्सारी हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दोन्ही प्रकरणांमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेला एमडी नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नागपुरातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.