पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम; २७० बंदींना कौशल्य प्रमाणपत्रांचे वाटप

Image Source:(Internet)
नागपूर : शिक्षा भोगत असतानाच कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्याच्या दिशेने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदींनी आणखी एक पाऊल टाकले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिला व पुरुष बंदींनी तयार केलेल्या राख्या आणि विविध हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनासह विक्री केंद्राचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २७० बंदींना प्रमाणपत्रे देण्यात आली.
कारागृहातील बंदींना शिक्षेसोबतच रोजगाराचे आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, विणकाम, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, धुलाईगृह तसेच वाहन धुलाई केंद्र यांसारखे विविध उपक्रम सुरू आहेत. या माध्यमातून बंदींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात येतो.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंदींनी तयार केलेल्या वस्तू थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रहाटे कॉलनीतील वर्धा मार्गावर, मेट्रो स्थानकाजवळ कारागृह परिसरात विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे महिला बंदींनी बनविलेल्या राख्यांसह हातमागाच्या साड्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शोभेच्या वस्तू, दऱ्या, आसनपट्ट्या, कपडे, चादरी, टॉवेल आणि रुमाल आदी साहित्य उपलब्ध आहे.
नागरिकांना या वस्तू सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत खरेदी करता येणार आहेत. बंदींनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना समाजाने पाठबळ द्यावे, असे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे.
यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी बंदींनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. चुका प्रत्येकाच्या आयुष्यात होऊ शकतात; मात्र त्या सुधारून पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने घडविण्याची संधी प्रत्येकाला असते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात पुन्हा स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी बंदींना दिला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बंदींना शिवणकाम, सुतारकाम, हस्तकला, बेकरी, सौर पॅनेल तंत्रज्ञान, विद्युत काम, स्वयंपाक आणि गृहव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २७० बंदींनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पोलीस आयुक्तांच्या हस्ते कौशल्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कुटुंबीयांपासून दूर असलेल्या बंदींनी तयार केलेल्या राख्या आता अनेक कुटुंबांच्या रक्षाबंधनाचा भाग ठरणार आहेत. आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंच्या माध्यमातून समाजाशी पुन्हा एक नाते जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक वैभव सु. आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे यांच्यासह कारागृह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा आगे यांनी केले, तर आभार अधीक्षक वैभव आगे यांनी मानले.
बंदींच्या हातातील कौशल्याला समाजाची साथ मिळावी आणि त्यांच्या पुनर्वसनाला बळ मिळावे, यासाठी नागरिकांनी विक्री केंद्राला भेट देऊन कारागृह निर्मित वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.