अभिजीत दीपके यांना रामदास आठवले यांचे पक्षात येण्याचे निमंत्रण;सीजेपी काय निर्णय घेणार?

    18-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनातून चर्चेत आलेले सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांना आता थेट राजकीय मैदानात उतरण्याचे निमंत्रण मिळाले आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दीपके यांनी आरपीआय (ए)मध्ये सहभागी व्हावे, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे.

समाजातील वंचित घटकांना बळ देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले समतेचे स्वप्न पुढे नेणे यासाठी दीपके यांनी पक्षात यावे, असे आठवले यांनी सांगितले. सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. मात्र, या प्रस्तावावर दीपके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दीपके यांनी यापूर्वी सक्रिय राजकारणात उतरण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. नवीन राजकीय पक्ष उभारल्याने देशातील सर्व प्रश्न सुटतील, असे मानता येणार नाही, असे ते म्हणाले होते. सध्या सामाजिक प्रश्नांवर काम करण्याला प्राधान्य देत असून, भविष्यात जनतेकडून तशी मागणी झाली तर राजकारणात येण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

सीजेपीकडूनही संघटनेचा राजकीय पक्ष बनवण्याऐवजी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दीपके यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली पुढील दिशा स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातून ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि खराब झालेल्या बाकांसारख्या प्रश्नांवर या मोहिमेतून लक्ष केंद्रित केले जात आहे.

खासगी शाळांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्याची मागणीही दीपके यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यातील आणि देशातील शाळांच्या सुविधांचा आढावा घेऊन त्याचा सोशल ऑडिट डेटा तयार करण्याची योजना त्यांनी मांडली आहे.

आठवले यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रस्तावानंतर दीपके यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.