
Image Source:(Internet)
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारदार शस्त्रांनी हल्ला करून २८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन मित्र जखमी झाले. मृत युवकाची ओळख शिवाजी पुतळा परिसरातील अक्षय प्रकाश शेट्टे अशी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षयचा भाऊ मयूर शेट्टे याला अटक केली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचा मोठा भाऊ मयूर हा दारूच्या नशेत घरी येऊन आजीला मारहाण करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अक्षय आपल्या मित्रांसह मयूरचा शोध घेत त्याला समजावण्यासाठी निघाला होता. मात्र, मयूर न सापडल्याने त्याच्या मित्रांसोबत अक्षय आणि त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली.
यानंतर अक्षय, आकाश पटले आणि अंकित चव्हाण हे अशोक चौकातून शिवाजी पुतळ्याकडे दुचाकीने जात असताना मोरघडे होमिओपॅथी क्लिनिकसमोर त्यांच्या दुचाकीला मागून मोपेडने धडक देण्यात आली. धडक दिल्यानंतर रितेश उर्फ सोनू डेंगे, अमोल उर्फ भुऱ्या खुरसोड आणि अर्पित बुधे यांनी तिघांवर हल्ला केला.
या हल्ल्यात आकाश आणि अंकित यांना मारहाण करण्यात आली, तर अक्षयवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी अक्षयला मित्रांसह मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मयूर शेट्टे याला अटक केली आहे. तर रितेश डेंगे, अमोल खुरसोड आणि अर्पित बुधे या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.