
Image Source:(Internet)
नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कुंभमेळ्याचा खर्च, ओबीसी आरक्षण, मराठा समाजाला दिली जाणारी प्रमाणपत्रे, मुंब्रा नामांतरासह विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
कुंभमेळ्याच्या नावाखाली धार्मिक भावनांचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, खराब रस्ते आणि शिक्षण व्यवस्थेतील अडचणी असताना एवढा मोठा खर्च करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. ओबीसींच्या प्रश्नांवर सरकारने सातत्याने बैठका घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसींच्या जागांवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.
मुंब्राचे नामांतर करून मुंबादेवी करण्याच्या मागणीवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक भावना भडकवण्याचे आणि मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी अशा कारवाईला घाबरणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेतला असून, युवक आणि महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. मुंडे यांचा ओबीसी नेता म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला.
चिमूरच्या हुतात्मा दिनाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी चिमूरच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मीरमधील दहशतवाद, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि शांततेचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नसल्याची टीका त्यांनी केली.