नागपुरातील यशोधरानगरमध्ये एमडी तस्करीचा पर्दाफाश; २८ ग्रॅम एमडीसह तिघे अटकेत

    17-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात यशोधरानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यशोधरानगर पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालत होते. यावेळी ऑटोमोटिव्ह चौकाजवळ काही जण एमडीची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी करून संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत ऋतिक उपवंशी, पियूष वाघ आणि देवांग सुनारे या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २८ ग्रॅम एमडी आढळून आले. याशिवाय एक दुचाकी आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे सव्वा तीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी एमडी नेमकी कुठून आणली होती आणि ती कोणाला विक्री करण्यासाठी नेली जात होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.