

Image Source:(Internet)
नागपूर : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात तारापीठ मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रामपूरहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास बिंदिशिनी हॉटेलमध्ये आग लागली. त्यावेळी हॉटेलमधील बहुतांश पाहुणे गाढ झोपेत होते. एअर कंडिशनरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरुवातीला तळमजल्यावर लागलेली आग काही वेळातच वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली.
आगीमुळे संपूर्ण हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि काहींचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि हॉटेलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दुर्घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
तारापीठचे धार्मिक महत्त्व-
बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ हे देवी तारेला समर्पित असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. शक्ती उपासनेच्या दृष्टीने या परिसराला विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
दुर्दैवाने, हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले हे भाविक सोमवारी सकाळी तारापीठ मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत होते. मात्र दर्शन घेण्यापूर्वीच आगीच्या या भीषण दुर्घटनेत त्यांचा अंत झाला. या घटनेमुळे तारापीठ परिसरात शोककळा पसरली असून भाविकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.