स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपुरात सरसंघचालकांचे देशाच्या भवितव्यावर भाष्य

Image Source:(Internet)
नागपूर : भारताची वाढती तरुण लोकसंख्या देशाच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे. मात्र, या तरुण शक्तीला योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी देऊन राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने वळविले नाही, तर हीच शक्ती भविष्यात देशासाठी ओझे ठरू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भागवत यांनी भारताच्या विकासासमोरील आव्हाने आणि नागरिकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
भारत स्वतंत्र होता, स्वतंत्र आहे आणि पुढेही स्वतंत्र राहील. मात्र, देशाची सुरक्षा, समृद्धी आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. भारताने केवळ स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरेल, असे राष्ट्र उभारण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असे भागवत म्हणाले.
तरुणांच्या क्षमतेला दिशा द्या-
देशातील तरुण वर्ग ही भारताची मोठी ताकद आहे. त्यांच्या ऊर्जेचा आणि क्षमतेचा योग्य उपयोग झाला, तर देशाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. मात्र, तरुणांच्या अपेक्षा आणि क्षमतांकडे दुर्लक्ष झाले, तर लोकसंख्येचे हे बळ विकासाचे साधन न ठरता सामाजिक आणि आर्थिक आव्हान बनू शकते, असे भागवत यांनी सांगितले.
लोकशाहीत मतभेदांनाही स्थान-
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. देशात विविध विचारधारा आणि मतप्रवाह असणे ही लोकशाहीची ओळख आहे. जनतेच्या हितासाठी आवश्यक असेल, तर सरकारच्या निर्णयांना विरोध करणे आणि आंदोलन करणेही योग्य आहे. मात्र, विरोध करताना देश आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांचा समतोल विचारात घेतला होता. त्यामुळे लोकशाहीतील अधिकारांचा वापर करताना कर्तव्यांची जाणीव ठेवणे तितकेच आवश्यक आहे, असे भागवत यांनी नमूद केले.
भारताला सुखी, सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली पाहिजे. भारत जगासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.